Thursday, January 31, 2019

मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना

मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व  प्रस्तावना 


मागील लेखांत आपण मोडी लिपीचा उगम , विकास , इतिहास , मोडी लिपीचे खरे जनक कोण ? इत्यादी अनेक विषय अभ्यासले . अशा या आपल्या मोडी लिपी विषयी आत्ता नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनात ती शिकण्याची ओढ निर्माण झालीच असणार . मला तरी असे वाटते की, प्रत्येकाने या आपल्या ऐतिहासिक लिपीचा अभ्यास केलाच पाहिजे . तिचे थोडे तरी ज्ञान घेतलेच पाहिजे. छपाईच्या दृष्टीने मोडी लिपीची मर्यादा सिमीत झाल्याने कालौघात ही लिपी हळूहळू मागे पडली . ती राजदरबारातूनच नव्हे तर व्यवहारी जीवनातूनही मागे पडली इतकेच नव्हे तर ती हळूहळू मोडीतच गेल्यात जमा झाली .


आजही आपण शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रांवर नजर टाकल्यास त्यातील बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच आहेत हे दिसेल . तसे आजही खाजगी संस्थांकडे , शासकीय , निमशासकीय , जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय , भूमी अभिलेख कार्यालय , नगर पालिका येथील जूने दस्तऐवज मोडी लिपी मध्ये आहेत .


महाराष्ट्र शासनाच्या पुरलेखागारातील पुणे पुरालेखागाराचे  उदाहरण द्यावयाचे झाले तर या ठिकाणी पेशवा दप्तरातील १५९० पासूनचे मोडी लिपीतील अभिलेख ठेवण्यात आले आहेत.  एका लिपीतील , एका भाषेतील एका राजवटीतील व एकाच राज्याची इतिहास सांगणारी सन १५९० ते १८६५ म्हणजेच सुमारे २५० वर्षाची ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत .


या व्यतिरिक्त मुंबई , पुणे , धुळे , इंदूर , ग्वाल्हेर , तंजावर , कर्नाटक,केरळ  इत्यादी अनेक जमीन महसूल विभाग ते सरकारी दप्तरखान्यांतून व पुरलेखागारातून कोट्यावधी कागद मोडी लिपीत लिहिलेले आहेत मात्र आज अशी स्थिति की मोडी जाणकार किंवा मोडी लिपीतील अभिलेखांचे वाचन करणारे अत्यंत अल्प असल्याने या दस्तऐवजांचे वाचन होत नाही .


कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहात नाही त्याप्रमाणे सरकारने मोडी लिपी बंद केली  असली तरी,मोडी लिपीचा काळ जरी गेलेला असला तरी जुनी कागदपत्र तर आहेतच . पण ते वाचण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी वाचक नाहीत आणि म्हणूनच कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिक्षणाशिवाय पर्याय नाही . कारण भाषा, लिपी व व्यवहार यांचा संबंध वेगवेगळा असला तरी मोडी लिपीचे शिक्षण घेणे हे शासकीय दप्तरातील मोडी लिपीतले कागदपत्रे पाहता आवश्यक आहे .


कारण अशा प्रकारची कागदपत्रे केवळ सरकारी कचेर्‍यांतच नव्हे तर आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या घरांत , गावोगावी देवळांत देखील उपलब्ध आहेत . गावोगावी अस्तित्वात असलेली खरेदीखत , गहाणखत , बोटखते , फारोक्तखते , करारपत्रे , दान पत्रे , वाटणी पत्रे अभयपत्रे , मृत्यूपत्रे , जाहीरनामा , राजपत्र केवळ आपल्याला वाचता येत नाहीत पण महत्वाची आहेत . त्यात काय लिहून ठेवले आहे हे कोणाला कसे समजणार हा प्रश्न सर्वांना भेडसावणारा आहे. म्हणून आपल्याला मोडीचा अभ्यास करायला हवा .


मोडी लिपीची भाषा मराठीच असते त्यामुळे मोडी लिपीचा कागद आपण मराठीत (देवनागरी) लिपीत करतो त्याला " लिप्यंतर " (Translitereation)  असे म्हणतात .त्याला भाषांतर (translation) असे म्हणायचे नाही हे लक्षात ठेवा.


सामान्यतः फारशी लिपीला " पिशाच्च " लिपी म्हणतात.  कारण ती उजवी कडून डावीकडे लिहीली जाते . परंतु मोडी लिपीलाही पूर्वी  " पिशाच्च " लिपी म्हणत असत . ते का म्हणतात हे तुम्हाला प्राथमिक (Basic) मोडी लिपीचा अभ्यास करताना समजेलच. आणि हा प्राथमिकचा (Basic) अभ्यास जसजसा प्रगत (Advance) कडे वळेल तसतशी पिशाच्च /मोडी लिपी तुम्हाला अधिकाधिक आवडू लागेल. व तिचा अधिक अभ्यास करण्याकडे तुमचा कल आणखी वाढेल .


मोडी लिपी ही इतिहासात डोकावण्याचा राजमार्ग आहे . लिपी वाचता येत असल्यास आपण इतिहासातील अनेक पुरावे आणि तत्कालीन परिस्थिति , खरेदी विक्री व्यवहार , आज्ञापत्रे सामाजिक , आर्थिक, कौटुंबिक कागदपत्रे निश्चित समजून घेऊ शकतो . असे म्हणतात जे इतिहास विसरतात त्यांना भविष्यकाळ नसतो . असा इतिहास शोधून काढायचा असेल तर मोडी लिपितील ही कागदपत्रे वाचणे अत्यंत आवश्यक आहे .


शिकण्याची आवड जरी असली तरी या साठी वेळ देणं पण महत्वाच आहे . पण यासाठी सर्वांनाच एखाद्या मोडी लिपी वर्गाला उपस्थित राहणे शक्य होत नाही . त्यामुळे घर बसल्या ज्यांना मोडी निदान प्राथमिक (basic) स्तरावर तरी लिहायला , वाचायला यावी अशा सर्वांसाठी मी हा ब्लॉग बनवला आहे . या माध्यमातून तुम्ही प्राथमिक (बेसिक) स्तरावर अभ्यास करून हळूहळू तुमचा प्रवास प्रगत कडे नक्कीच वळवाल अशी मला खात्री आहे.


ब्लॉग वरील लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा . कमेन्ट (comment  ) करा . ईमेल (email) करा . तुम्हाला आणखी काही माहिती या विषयाला अनुसरून पाहिजे असल्यास जरूर मला सांगा. मला त्या संदर्भात काही ज्ञात  असेल तर मी नक्कीच तुमच्या पर्यन्त ते पोहोचवेन . तुमच्या सोबत share करायला मला नक्कीच आवडेल . कारण शेवटी दिल्याने , share केल्याने ज्ञान वाढते .


ब्लॉगवरील लेखांत  मोडी जाणकारांना ,तज्ञांना  काही त्रुटी अथवा काही चुकीचे लेखन अथवा माहिती आढळल्यास त्यांना ही विनंती मला जरूर मार्गदर्शन करा .


आपणा सर्वांचे आभार ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल . व जे मोडी लिपी शिकण्यासाठी म्हणून ब्लॉग वरील लेख वाचत आहेत त्यांचे विशेष आभार.  कारण तुमच्या येण्याने , शिकण्याने मोडी लिपी जाणकारांच्या संख्येत वाढ होणार आहे . व मोडीत गेलेली मोडी अभ्यासाच्या निमित्ताने का होईना पुन्हा प्रकाशात येऊ लागतेय .


पुढील लेखांपासून आपण प्रत्यक्ष मोडी लिपीच्या प्राथमिक अभ्यासाला सुरुवात करणार आहोत . तेव्हा तुमच्या जवळ १०० ते १५० पानांची फुलस्केप वही (long notebook) , पेन , पेन्सिल व फूटपट्टी घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा .

प्राथमिक अभ्यास पाठ १ मुळाक्षर शिकण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा :-
 
https://modeelipi.blogspot.com/2019/02/modi-lipi-mulakshar-basic-alphabets-lesson-barakhadi.html

Saturday, January 26, 2019

मोडी लिपी इतिहास

मोडी इतिहास 

मागच्या लेखात आपण मोडीचा उगम कसा झाला पहिले. मोडीच्या निर्मितीची आवश्यकता का लागली ? हे पाहिले . व पुढे ती कशी विकसित झाली व इतिहासाच्या पानांवर आपले असतीत्व उमटवले हे पाहिले .

आजच्या लेखात आपण काळानुसार मोडी टप्या-टप्या ने कशी व्यवहारात आली हे वाचूया.

काळानुसार मोडी लिपीचे विभाग पुढील प्रमाणे पाडता येतील :-

आद्यकाळ 
यादवकाळ 
बहामनीकाळ 
शिवकाळ
पेशवेकाळ
आङ्ग्लकाळ 


आद्यकाळ :-


हा काळ इ. स. १२०० पूर्व म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काळ होय .

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते , ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शके १२१२ (इ.स . १२९०) मध्ये लिहिला गेला. व हेमाद्री पंत हे इ.स .१२६० पासून देवगिरीच्या यादवांचे दफ्तरदार होते .

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी च्या १३ व्या अध्यायात मोडी लिपीचा अप्रत्यक्ष रीतीने उल्लेख केला आहे तो पुढील प्रमाणे :-

"हे बहू असो. पंडितू  धरुनू बालकाचा हातू 
वोळा लेहेले वेगवन्तू आपणची l "

या ओवीतील " वेगवन्तू " हा शब्द राजवाडे यांना महत्वाचा वाटतो . बालबोध / देवनागरी अक्षर वेगाने लिहिता येतं नाही त्यामुळे देवनागरी लिपिला उद्देशून  " वेगवन्तू " ( वेगवंत ) हा शब्द योजला असावा असे त्यांना वाटत नाही . त्यांच्या मते मोडी अक्षरांच्या संबंधाने तो महाराजांनी योजला असावा . हा  " वेगवन्तू " शब्द ते मोडी ची साक्ष म्हणून सांगतात.यावरून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्वी मोडी होती असे अनुमान काढले .





तसेच खालील उल्लेखांवरून ही मोडी ज्ञानेश्वरी पूर्वी अस्तित्वात होती हे सिद्ध होते 
" सुखाची लिपी पुसिली ll " ज्ञानेश्वरी अध्याय ३ ओवी क्र ३४६ 
" दोषांची लिहिली फाडी ll " ज्ञानेश्वरी अध्याय ४ ओवी क्र ५२ 

" आखरे पुसलीया ना पुसे , अर्थ जैसा ll " ज्ञानेश्वरी अध्याय ८ ओवी क्र १७४   

ज्ञानेश्वर महाराज व हेमाद्री पंत हे समकालीन होते. यावरुन हेमाडपंतांच्या पूर्वीही मोडी लिपी अस्तित्वात होती हे सिद्ध होते.


यादवकाळ :-  


इ.स. १२०० ते १३५० या काळात देवगिरीचे यादव महाराष्ट्रावर राज्य करीत होते. व यांच्या काळात मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा होता.


दक्षिण हिंदुस्तानात यादवांचे  साम्राज्य असताना,महादेवराव  यादवांच्या कारकिर्दीत हेमाडपंत ( इ.स.१२६० श. ११८२ ) प्रख्यात महामंत्री होते व याच काळात त्यांनी राजकीय व खाजगी कागदपत्र लिहिण्याचे कामी मोडी लिपी नव्याने प्रचारात आणली.

या काळात लेखनासाठी बोरूचा वापर करीत असत. बोरू म्हणजे ७-८ इंच लांब बांबूच्या तुकड्याच्या टोकाला तिरपा छेद देऊन तिची लेखणी तयार करीत असत. बोरूने लेखन करताना तो सारखा सारखा प्रत्येक अक्षर लिहिताना दौतीत बुडवावा लागत असे त्यामुळे अक्षर मोठी ,स्पष्ट दिसत असल्यामुळे वाचायला सोपे वाटायचे .


बहामनीकाळ :--

हा काळ इ.स. १३५० ते १६०० असा आहे यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला. हिंदुस्थानातील पहिली शिया मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. त्यांना स्थानिक लोक व भाषेशी काही कर्तव्य नव्हते.सरकारी भाषा फारसी  झाल्याने , मराठी भाषेत फारसी शब्दांचे आगमन झाले . लिखाणासाठी कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण " कागज " हा फारसी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही .

बहामनी  राज्याची ५ शके :- 
अहमदनगरची निजामशाही १४९६  -१६३७
विजापूरची आदिलशाही  १४९० - १६८०
बिदरची बरीदशाही १५०४ - १६१९
गोवळकांडयाची कुतूबशाही १५४३ - १६८७
वर्‍हाडाची इमादशाही १५१० -१५७४

या काळातील साहित्य जुन्या हस्तलिखितांतून अवतीर्ण झाले असून मुळ ग्रंथकर्त्याची हस्थालिखिते उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या उत्तरकालीन प्रतीच उपलब्ध होतात. त्यामुळे मूळग्रंथाचे स्वरूप कसे होते याची कल्पना येत नाही.


शिवकालीन :- 

इ.स. १६०० ते १७०० या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले .याच काळात शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राजव्यवहार कोश बनवताना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले व रघुनाथ पंडितांनी तंजावरच्या धुंडीराज व्यास यांच्या कडून लिहून घेतला .


या काळात लेखनातून बोरूचा वापर कमी होऊन त्या जागी टाकाने लिहिणे सुरू झाले. टाकाच्या निफामध्ये जास्त शाई घेतली जात असल्याने लेखनाचा वेग वाढला. पण टाकाने लिहिलेला मजकूर अधिक लपेटीदार आकाराने लहान व वाचनास क्लिष्ट वाटू लागला. त्यात अनेक शब्द संक्षेप वापरले जाऊ लागले. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी यात बर्‍याच सुधारणा करून लेखनाचा वेग वाढविला. मात्र त्यांत अरबी - फारसी भाषेतील शब्द येऊ लागल्याने वाचनास थोडे कठीण होऊ लागले





पेशवेकाळ   :- 


१७०० ते १८१८ मोडी लिपी पेशवे काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे दिसून येते. पेशव्यांच्या दाप्तरातील कागदपत्रे , दस्तऐवज बघूनच त्यांच्या उत्कर्षाची कल्पना येते.पेशवाईतील टाकाने लिहिलेले अक्षर अत्यंत घोटीव , लपेटीदार , सुवाच्य ,सुबक अक्षर , दोन ओळीतील समान अंतर , काटेकोर शुद्धलेखन , ऐटबाज आणि वाचनीय असे होते.   पेशवे काळातील लिखाण बोरूने होत असे.




वळणाच्या दृष्टीने चिटणीसी , महादेवपंती , बिवलकरि आणि रानडी वळण असे प्रकार आढळून आले आहेत . या काळांत सर्व पत्र व्यवहार , राजकारण समाजव्यवस्था, न्यायनिवडा , हुकूम , सनद , राजकीर्द वगैरे सर्व मोडीतच लिहीत.  त्याच वेळी इंग्रजांचा पसारा हळूहळू वाढल्याने इंग्रजी शब्दांचा भरणा मोडीत असल्याने अपभ्रष्ट रूपांचा मजकूर वाचानास अतिशय कठीण समजला जाऊ लागला .



आङ्ग्लकालीन  :-  

इ.स. १८१८ ते १८७४ या इंग्रजी अमलान्त काही काळ मोडी व इंग्रजी असे जोडून लिखाण होत असे लेखनासाठी  शाईने भरलेल्या फाऊंटन पेन चा वापर होऊ लागला . फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राहायची . पण अक्षर बोरू इतके सुंदर नसायचे .  इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मोडीत अनेक इंग्रजी शब्द येऊ लागले त्यामुळे वाचन दुर्बोध होत गेले.  राजकारभारात मोडी चा वापर कमी होऊ लागला . उचभ्रु , सुशिक्षित लोकं आपले लिखाण मोडी ऐवजी इंग्रजीत करणे प्रतिष्ठेचे मानू लागले. व हळूहळू मोडी लिपी अस्त होऊ लागली .


मोडी व्यवहारात ठेवावी अथवा न ठेवावी यावर बरीच चर्चा १९१८ ( श. १८४० ) च्या सुमारास महाराष्ट्रात चालू होती ४-५ वेळा रद्दही करण्यात आली पण बरीच रदबदली करून कायदे कौन्सिलात तसा ठराव पास होऊनही मोडी लिपीला पुन्हा राजमान्यता प्राप्त झाली .

सन १९५२ नंतर शालेय पाठ्यक्रमातून मोडी लिपी वगळण्यात आली . काही काळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोडी अभ्यासक्रमात होती . मात्र हळूहळू मोडी हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला . ट्रेनिंग , कॉलेज मधील विध्यर्थ्यांना  मोडीत निबंध लिहावा लागत असे .

पुढे  इ. १९५९(श . १८८१ ) रोजी मंत्री मंडळाने मोडी लिपीला अनावश्यक ठरवून ती पूर्णपणे शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली व त्यामुळेच आजच्या पिढीला मोडी लिपी संदर्भात कोणतीही जाणीव नसणे हे स्वाभाविक आहे .
  

Monday, January 21, 2019

मोडी लिपी उगम , विकास , इतिहास

मोडी लिपी उगम , विकास , इतिहास



मोडी लिपी ही स्वतंत्र लिपी नसून देवनागरीची व "कुटिल लिपी"ची एक उपलिपी आहे , असे काहींचे म्हणणे आहे . कुटिल लिपीची निर्मिती ही "ब्राह्मी लिपी" पासून झाली . ब्राह्मी लिपी पासून "गुप्त लिपी" बनली गेली . गुप्त राजाच्या कारकीर्दीत उत्तर हिंदुस्थानातील बहूतेक भागांत प्रचलित होती. कुटिल लिपीच्या नावावरूनच या लिपीच्या निर्मितीची गरज अथवा तिचे वैशिष्ट्य काय असेल याचा बोध होतो . ब्राह्मी लिपीतील स्वर , व्यंजन , मात्रांना लिहिण्यासाठी सोपी पडावी म्हणून त्यांच्या वळणात योग्य तो बदल करून बनवली गेली . हा बदल करताना त्यांच्या मुळाक्षरांच्या वळणात वाकडेपणा  , वक्रता दिसून येतो . म्हणून या लिपीला "कुटिल लिपी "किंवा मुरडलेली लिपी अर्थात "मोडी लिपी" असे म्हणतात . इ . स . ६ व्या शतकात ही लिपी प्रचारात होती . (राष्ट्रकूट वंशीय दंतीदुर्ग राजाच्या वेळचा इ .स ७५४ मधील शिलालेख या लिपीतून कोरलेला उपलब्ध आहे .) कुटिल लिपी ला "कायस्थ" तसेच "कैथी " लिपी असेही म्हणतात . कुटिल लिपी पासूनच मोडी लिपी बनली असावी असे काही विद्वानांचे मत आहे . कुटिल हा संस्कृत शब्द आहे व मोडी हा मराठी शब्द आहे. मात्र या दोन्ही शब्दांचा अर्थ  एकच.  ज्या अक्षरांच्या मुळ वळणात मोड पाडली गेली  अथवा ते मुरडले गेले . अशा अक्षरांच्या वर्ण मालेला मोडी अथवा कुट लिपी असे म्हणतात .यावरून मोडी लिपी ही स्वतंत्र लिपी नसून "देवनागरी" अथवा "कुटिल लिपी"ची च एक उपलिपी आहे असे मानले जाऊ लागले .



इतिहास



मोडी लिपी ही नेमकी केव्हापासून सुरू झाली या बद्दल इतिहासात एकमत नाही . काही विद्वानांच्या मते या लिपी चा उगम सुमारे २ हजार वर्षे इतका असावा . भारतात मगध  साम्राज्यात मौर्य वंशाचे महापराक्रमी राजे चंद्रगुप्त मौर्य  , सम्राट अशोक यांच्या काळात मोडी अस्तित्वात आली असे मानले जाते  .

मौर्यांची लिपी म्हणून तिला "मोडी " म्हटले जाऊ लागले .

मोडी लिपीत अपूर्ण वर्ण काढायची सोय नाही . त्यामूळे संयुक्त वर्ण बालबोध प्रमाणे मोडी लिपीत            बिनचूक लिहिता येत नाहीत .
उदाहरणार्थ 'व्य'  चे लेखन 'वय' असे केलेले आढळते.

त्या काळात अशोक लिपी होती . त्यातही र्‍हस्व , दीर्घ व्यवस्था नसल्यामुळे अशोक लिपीची सुधारित        आवृत्ती म्हणजे मोडी लिपी असे मानले गेले . 


दुसरे मत असे की सुमारे सातशे वर्षापूर्वी दक्षिण हिंदुस्थानात यादवांचे साम्राज्य होते. महादेव राव यादवांचे कारकीर्दीत हेमाडपंत किंवा हेमाद्रिपंत नामक प्रख्यात महामंत्री होऊन गेले.  ( इ .१२६० श ११८२ ) हेमाड पंतांचे मराठी भाषेवर अलोट प्रेम होते.त्यांनी मराठीत अनेक ग्रंथ लिहिले असावेत . खाजगी व राजकीय व्यवहारात लिहावायच्या पत्रांचे मायने कसे असावेत , याबद्दल त्यांनी काही मेस्तके (नियम) तयार केले होते . यादव राजा सिंघण यांच्या वेळेपासून दरबारचे काम संस्कृत भाषेत चालत होते . परंतू हेमाद्रीपंतांनी ही प्राचीन वहिवाट बदलून राजकीय कागदपत्र , सनदा, दानपत्रे, फर्मान, हुकूमनामे, निवाडपत्रे,इनामपत्रे वैगरे मराठीत  लिहिण्याचा नवीन उपक्रम सुरू केला. अर्थात देवनागरी हीच दरबारची लिपी होती . परंतु त्या लिपीत सुबोध व सुवाच्य रितीने लिहावयाचे म्हटल्यास वेळेचा अपव्यय होतो . हे टाळण्यासाठी व अल्प वेळांत बराच मजकूर लिहिता यावा म्हणून हेमाद्रीपंतांनी "लघुलेघन पद्धती " तयार केली . तिलाच "मोडी लिपी" असे म्हटले जाते. तिचे जनकत्व हेमाद्रीपंतांकडेच  जाते


असे म्हटले जाते की हेमाडपंताना बाजरीचे बी व मोडी लिपी  आणण्यासाठी लंकेला जावे लागले . हेमाडपंतांनी अनेक सुधारणा राज्यात घडवून आणल्या.  दूरवर पसरलेल्या साम्राज्यातील पत्रव्यवहार झपाट्याने व्हावा यासाठी देवनागरी लिपीत सुधारणा करुन त्यांनी मोडी लिपी तयार केली असावी .


परंतु प्रसिद्ध मोडी लिपी तज्ञ श्री. ल.श्री.वाकणकर यांना हे मान्य नाही की हेमाडपंत  बाजारीच बी व मोडी लिपी आणण्यास तिथे गेले असतील , कारण देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य कन्याकुमारीपर्यंत पसरलेले होते . व लंका हा जवळचा प्रदेश म्हणून ते लंकेत (इ.१९८० श १९०२ ) गेले होते . दक्षिणेकडील प्रांतात जाऊन  साम्राज्यातील दप्तरे तपासण्यास ते गेले होते . व कदाचित लंकेची यात्रा करुन आल्यावर सर्व दप्तरे मोडीत लिहिण्याचे वटहुकूम काढण्यास एकच गाठ पडल्यामुळे लंकेचा व मोडी लिहिण्याचा संबंध जोडला गेला असावा . ते लंकेत (इ.१९८० श १९०२ ) गेले होते त्यावेळी त्यांनी कोलंबोच्या सरकारी छापखान्यात " सिंहली " अक्षरांना गणकयंत्रात बसवण्याच्या दृष्टीने अभ्यास केला पण तेव्हा त्यांना "सिंहली " व मोडी लिपीत काहिही साम्य दिसून आले नाही . तसेच मौर्य या शब्दाचा मोडी हा अपभ्रंश देखील ते अमान्य करतात . कारण मौर्य राज्य काळी मोडी च्या जन्माची ही शक्यता नव्हती . देवनागरीत जो काना वरुन खाली काढतात तो शेवटी लेखनाचा वेग वाढवण्यासाठी खालून वर नेण्याच्या प्रयत्नाने मोडी वळण निर्माण झाले . व ही घटना हेमाडपंतांच्या कारकीर्दीत घडणे शक्य आहे .


तिसरे मत असे की शिवाजी महाराजांचे विद्वान चिटणीस बाळाजी आवजी यांचेही ही नाव या संदर्भात घेतले जाते  तथापि बाळाजी आवजी च्या पूर्वीचे हजारो मोडी कागद उपलब्ध असल्याने त्यात तथ्य नाही.कदाचित बाळाजी आवजीने मोदी लिपीत काही बदल  करून तिला अधिक वळणदार स्वरूप करून देण्याचा प्रयत्न केला असणे शक्य आहे.


मोडी  लिपीतील सर्वात जुना उपलब्ध असलेला कागद इ १३८९ (श १३११) मधील असून तो " भारत इतिहास संशोधक मंडळाच्या " संग्रहालयात उपलब्ध आहे .

देवनागरी व मोडी लिपि यांचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर मोडी लिपि तज्ञ श्री. ल. श्री. वाकणकर यांचे आज असे स्पष्ट मत झालेले  आहे की मोडी लिपी चा उगम इतर कुठल्याही लिपीतून झालेला नसून देवनागरी लिपीतूनच झालेला आहे. मोडी लिपी ही देवनागरी लिपीचीच जलद लिपी मानली गेली पाहिजे

देवनागरी बालबोध अक्षरे सूटी सुटी लिहावी लागतात. एकच अक्षर लिहिताना लेखणी सारखी सारखी उचलावी लागते . त्यामुळे लिखाणाचा वेग मंदावतो. तसेच अक्षरांवर दिली जाणारी रेघ, काना,मात्रा, वेलांटी, विरामचिन्हे ही सुद्धा द्यावी लागतात , त्यामुळे जलद लिखाणासाठी म्हणून मोडी चा वापर सुरू झाला असेच  मानले पाहिजे .


वरील सर्व गोष्टींचा विचार करून सुमारे सातशे वर्षा पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश या विस्तृत भूभागावर यादवांचे साम्राज्य होते त्यांतील महादेवराव यादवांचे कारकिर्दीत हेमाडपंत नामक प्रख्यात महामंत्री (करणाधीप) होऊन गेले (इ १२६० श ११८२) या हेमाडपंतांनि राज्यांचे कारभार , दप्तरांतील कामे, हिशेब , पत्रव्यवहारादी कामे  जलद गतीने होण्यासाठी म्हणून मोडी लिपीचा वापर करण्यास सुरुवात केली . यादवकालात सरकार दरबारी मोडी लिपीला स्थान मिळाल्यामुळे साहजिकच तिचा प्रसार राज्याच्या  कानाकोपर्‍यात झपाट्याने होऊ शकला व मोडी लिपी व्यवहारात आली .     


मोडी लिपी ईतिहास आणखी सविस्तर माहिती खालिल लिंक वर क्लिक करून वाचा :-

https://modeelipi.blogspot.com/2019/02/modi-lipi-itihas-history.html

Thursday, January 17, 2019

लिपी म्हणजे काय ?


लिपी म्हणजे काय ?


मोडी लिपी म्हणजे जलद लिहिण्यासाठी वर्ण मोडून लिहिण्याची प्रचारात आलेली पद्धत . मोडी लिपीला मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली मानली जाते , मोडी लिपी ही देवनागरी लिपीची एक सुबक लपेटीतील शीघ्र लिपी आहे. भाषेला लिखित स्वरूप देणारी लिपी एखाद्या भाषेची स्वतःपूर्ती असते . अनेक भाषा एकच लिपी वापरतात तसेच एकाच भाषेतले लिखाण अनेक लिप्यांतही सापडते. काळाच्या ओघात अनेक भाषा विरून गेल्या , तश्या अनेक लिप्याही.

 लिपी या शब्दाचा उगम हा मूळ "लिप्" यापासून झाला आहे . "लिप्" म्हणजे लिंपणे , माखणे , सारवणे . आपण कागदावर शाईने अक्षर , शब्द , चित्र , चिन्ह इत्यादी "लिंपतो" म्हणून त्याला लिपी असे म्हणतात .

लिप्यांचे दोन ठळक प्रकार सांगता येतात -


१ मुळाक्षरांना एक ठराविक अक्षर ठरवून त्याला योग्य ते वळण ठरवून लिहिली जाते .

२ तर दुसरा प्रकार चित्रलिपी .

तसेच काही लिप्या ह्या चिन्हांचा वापर करून सुद्धा लिहिल्याला सापडतात . चीन ,जपान या प्रदेशांत चित्रलिपि प्रचलीत , तर रोमन , देवनागरी या मूळाक्षर चा वापर करून लिहिलेल्या लिप्या आहेत .

पूर्वी दगड, लाकूड , चामडे , गुहा , ताम्रपट लिहिलेले सुद्धा सापडतात . पण अशा वस्तु अथवा वास्तू वर लिहिलेला मजकूर हा शाईने लिहिलेला नसतो . तो एखाद्या टोकदार हत्यार वापरुन कोरून लिहिलेला असतो . याला कोरणे म्हणतात . उदाहरणार्थ - "शिलालेख". "लीख" म्हणजे कोरणे. शिलालेख याचाच अर्थ शिळेवर , दगडावर कोरलेला लेख व त्यावरूनच "लेखन " हा शब्द तयार झाला .

अशा एकेकाळी वापरात असलेल्या पण आता ज्ञात नसलेल्या लिप्यांची संख्या किती असेल कोणास ठाऊक . कुतूहल हा माणसाचा एक मुळ्धर्म असल्याने अलिकडच्या शतकात अशा लुप्त झालेल्या काही लिप्या पुन्हा उजेडात आल्या .

मुळाक्षरांवर आधारीत असो वा चित्रांवर वा चिन्हांवर लिपीतल्या प्रत्येक प्रतीकांचा एक उच्चार असतो . प्रत्येक भाषा हि प्रथम बोलली जाते . लिहिणे फार नंतरचे. त्या त्या भाषेची एक उच्चार पद्धत त्यामुळे तयार होते. त्यामुळे कुठलीही लिपी उलगडताना मूळ वापर कुठल्या भाषेचा आहे , हे महत्वाचे ठरते . मात्र तेवढ्याच ज्ञानावर लिपी उलगडता येत नाही हे हि खरे .

 राजनैतिक , सैनिकी , नागरी क्षेत्रांमधे सांकेतिक भाषेचा वापर फार प्राचीन काळापासून सुरू आहे . हि सांकेतिक भाषा मुद्दाम बनवलेली असते . आपले निरोप , संदेश , आज्ञा , माहिती हे विरुद्ध पक्षाला , त्रयस्ताना कळू नयेत यासाठी निर्माण केलेली असते . विरोधी बाजूची अशी सांकेतिक भाषा उलगडण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो . सांकेतिक भाषा घडवणारे विरुद्ध ती उलगडण्याचा प्रयत्न करणारे ,ही लढाई प्राचीन काळापासून सुरूच आहे .

अशा भाषा उलगडण्यांच्या प्रयत्नांतून ज्या गणिती रिती ज्या युक्त्या माहित झाल्या त्यांचाही एक लांब रुंद इतिहास आहे . इथेही भाषा कुठली याला महत्व आहे . मुख्य म्हणजे अशा रिती युक्त्या याची फार मोठी मदत लिप्या उलगडण्यासाठी होते .

अशीच आपली ही देवनागरी ची जलद लिपी म्हणजेच "मोडी लिपी " जिला " पिशाच्च लिपी " असे देखील संबोधले जाते . ही मोडी लिपी म्हणजेच इतिहासात डोकावण्याचा राजमार्गच आहे .

सध्या आपला अभ्यास हा मोडी लिपी लेखन व वाचन यावर आहे . तरी लिपी विषयक अधिक माहिती मोडी प्राथमिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लिहेन .

Wednesday, January 16, 2019

मोडी लिपी सामान्य माहिती

मोडी लिपी सामान्य माहिती

जगभरातून एकूण दहा हजारांहून अधिक भाषा बोलल्या जातात. तर भारतात १६५२ भाषा
वापरात आहेत . पैकी २२ भाषा मान्यताप्राप्त आहेत .

कालौघात प्राचीन गोष्टी हळू हळू लोप पावत जाणे हे नैसर्गिक असले तरी, एखादी भाषा लोप पावणे म्हणजे त्या भाषेशी निगडीत सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक दस्तऐवज कायमचे काळाच्या पडद्याआड जाणे होय आणि  जिथे भाषाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तिथे लिप्यांचे काय ?

अशीच एक लिपी  म्हणजे  मोडी लिपी. आपल्या मराठी भाषेची , देवनागरीची शीघ्रलिपी  इसवी सन १२५० ते १९५० अशी सातशे वर्षे मोडी वापरली जात होती मराठी साम्राज्याची सारी गाथा याच लिपी ने शब्दबद्ध करून काळाच्या प्रवासाला पाठवली ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांचे साम्राज्य पसरले त्या त्या ठिकाणीं मोडी लिपी चे प्रस्थ होते . मध्ययुगातील बरीचशी कागदपत्रे याच लिपीतून लिहिली गेली .  त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकांना, संशोधकांना , आजही या लिपिचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे . तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकालाच  मोडी लिपीचे थोडी तरी माहिती असणे आवश्यक आहे .


मोडी लिपी ही महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची  मौल्यवान  खासियत आहे .  मोडी लिपी महाराष्ट्राच खास वैशिष्ट्य आहे . हिंदवी स्वराज्याचा सारा लेखन संसार  मोडी लिपीतच चालत होता . मोडी सोपी आहे आणि तेवढीच  सुंदरही आहे . मोडीचे जलद व लपेटीदार लेखन हेच तिचे वैशिष्ट्य आहे कागदावर डावीकडून उजवीकडे सरळ ओळ आखून त्यावर हात वर न उचलता धावत्या  अक्षरात लिहीत जायचे कुठेही शब्द तोडायचे नाहीत किंवा कुठेही ह्र्स्व दीर्घ लिहिण्याचा नियम नाही .
इंग्रजीत जसे शॉर्टहँड असते तसेच मोडी हे मराठी चे प्राचीन रूपातील  शॉर्टहँड. अश्या ह्या लिपीत जेवढे साहित्य आहे, तेवढे जगातल्या  लुप्त झालेल्या कोणत्याही लिपीत लिहिलेले  सापडत नाही. अश्या लिपीचा अभ्यास करणे , त्यातील कागदपत्रे सांभाळणे , त्याचे लिप्यंतर करणे , अत्यंत आवश्यक आहे .