मोडी इतिहास
मागच्या लेखात आपण मोडीचा उगम कसा झाला पहिले. मोडीच्या निर्मितीची आवश्यकता का लागली ? हे पाहिले . व पुढे ती कशी विकसित झाली व इतिहासाच्या पानांवर आपले असतीत्व उमटवले हे पाहिले .
काळानुसार मोडी लिपीचे विभाग पुढील प्रमाणे पाडता येतील :-
१ आद्यकाळ
२ यादवकाळ
३ बहामनीकाळ
४ शिवकाळ
५ पेशवेकाळ
६ आङ्ग्लकाळ
१ आद्यकाळ :-
हा काळ इ. स. १२०० पूर्व म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काळ होय .
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते , ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शके १२१२ (इ.स . १२९०) मध्ये लिहिला गेला. व हेमाद्री पंत हे इ.स .१२६० पासून देवगिरीच्या यादवांचे दफ्तरदार होते .
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी च्या १३ व्या अध्यायात मोडी लिपीचा अप्रत्यक्ष रीतीने उल्लेख केला आहे तो पुढील प्रमाणे :-
"हे बहू असो. पंडितू धरुनू बालकाचा हातू
वोळा लेहेले वेगवन्तू आपणची l "
या ओवीतील " वेगवन्तू " हा शब्द राजवाडे यांना महत्वाचा वाटतो . बालबोध / देवनागरी अक्षर वेगाने लिहिता येतं नाही त्यामुळे देवनागरी लिपिला उद्देशून " वेगवन्तू " ( वेगवंत ) हा शब्द योजला असावा असे त्यांना वाटत नाही . त्यांच्या मते मोडी अक्षरांच्या संबंधाने तो महाराजांनी योजला असावा . हा " वेगवन्तू " शब्द ते मोडी ची साक्ष म्हणून सांगतात.यावरून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्वी मोडी होती असे अनुमान काढले .
तसेच खालील उल्लेखांवरून ही मोडी ज्ञानेश्वरी पूर्वी अस्तित्वात होती हे सिद्ध होते
२ " सुखाची लिपी पुसिली ll " ज्ञानेश्वरी अध्याय ३ ओवी क्र ३४६
३ " दोषांची लिहिली फाडी ll " ज्ञानेश्वरी अध्याय ४ ओवी क्र ५२
४ " आखरे पुसलीया ना पुसे , अर्थ जैसा ll " ज्ञानेश्वरी अध्याय ८ ओवी क्र १७४
२ यादवकाळ :-
इ.स. १२०० ते १३५० या काळात देवगिरीचे यादव महाराष्ट्रावर राज्य करीत होते. व यांच्या काळात मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा होता.
दक्षिण हिंदुस्तानात यादवांचे साम्राज्य असताना,महादेवराव यादवांच्या कारकिर्दीत हेमाडपंत ( इ.स.१२६० श. ११८२ ) प्रख्यात महामंत्री होते व याच काळात त्यांनी राजकीय व खाजगी कागदपत्र लिहिण्याचे कामी मोडी लिपी नव्याने प्रचारात आणली.
या काळात लेखनासाठी बोरूचा वापर करीत असत. बोरू म्हणजे ७-८ इंच लांब बांबूच्या तुकड्याच्या टोकाला तिरपा छेद देऊन तिची लेखणी तयार करीत असत. बोरूने लेखन करताना तो सारखा सारखा प्रत्येक अक्षर लिहिताना दौतीत बुडवावा लागत असे त्यामुळे अक्षर मोठी ,स्पष्ट दिसत असल्यामुळे वाचायला सोपे वाटायचे .
३ बहामनीकाळ :--
हा काळ इ.स. १३५० ते १६०० असा आहे यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला. हिंदुस्थानातील पहिली शिया मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. त्यांना स्थानिक लोक व भाषेशी काही कर्तव्य नव्हते.सरकारी भाषा फारसी झाल्याने , मराठी भाषेत फारसी शब्दांचे आगमन झाले . लिखाणासाठी कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण " कागज " हा फारसी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही .बहामनी राज्याची ५ शके :-
१ अहमदनगरची निजामशाही १४९६ -१६३७
२ विजापूरची आदिलशाही १४९० - १६८०
३ बिदरची बरीदशाही १५०४ - १६१९
४ गोवळकांडयाची कुतूबशाही १५४३ - १६८७
५ वर्हाडाची इमादशाही १५१० -१५७४
या काळातील साहित्य जुन्या हस्तलिखितांतून अवतीर्ण झाले असून मुळ ग्रंथकर्त्याची हस्थालिखिते उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या उत्तरकालीन प्रतीच उपलब्ध होतात. त्यामुळे मूळग्रंथाचे स्वरूप कसे होते याची कल्पना येत नाही.
३ शिवकालीन :-
इ.स. १६०० ते १७०० या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले .याच काळात शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राजव्यवहार कोश बनवताना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले व रघुनाथ पंडितांनी तंजावरच्या धुंडीराज व्यास यांच्या कडून लिहून घेतला .या काळात लेखनातून बोरूचा वापर कमी होऊन त्या जागी टाकाने लिहिणे सुरू झाले. टाकाच्या निफामध्ये जास्त शाई घेतली जात असल्याने लेखनाचा वेग वाढला. पण टाकाने लिहिलेला मजकूर अधिक लपेटीदार आकाराने लहान व वाचनास क्लिष्ट वाटू लागला. त्यात अनेक शब्द संक्षेप वापरले जाऊ लागले. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी यात बर्याच सुधारणा करून लेखनाचा वेग वाढविला. मात्र त्यांत अरबी - फारसी भाषेतील शब्द येऊ लागल्याने वाचनास थोडे कठीण होऊ लागले
४ पेशवेकाळ :-
१७०० ते १८१८ मोडी लिपी पेशवे काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे दिसून येते. पेशव्यांच्या दाप्तरातील कागदपत्रे , दस्तऐवज बघूनच त्यांच्या उत्कर्षाची कल्पना येते.पेशवाईतील टाकाने लिहिलेले अक्षर अत्यंत घोटीव , लपेटीदार , सुवाच्य ,सुबक अक्षर , दोन ओळीतील समान अंतर , काटेकोर शुद्धलेखन , ऐटबाज आणि वाचनीय असे होते. पेशवे काळातील लिखाण बोरूने होत असे.
वळणाच्या दृष्टीने चिटणीसी , महादेवपंती , बिवलकरि आणि रानडी वळण असे प्रकार आढळून आले आहेत . या काळांत सर्व पत्र व्यवहार , राजकारण समाजव्यवस्था, न्यायनिवडा , हुकूम , सनद , राजकीर्द वगैरे सर्व मोडीतच लिहीत. त्याच वेळी इंग्रजांचा पसारा हळूहळू वाढल्याने इंग्रजी शब्दांचा भरणा मोडीत असल्याने अपभ्रष्ट रूपांचा मजकूर वाचानास अतिशय कठीण समजला जाऊ लागला .
५ आङ्ग्लकालीन :-
इ.स. १८१८ ते १८७४ या इंग्रजी अमलान्त काही काळ मोडी व इंग्रजी असे जोडून लिखाण होत असे लेखनासाठी शाईने भरलेल्या फाऊंटन पेन चा वापर होऊ लागला . फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राहायची . पण अक्षर बोरू इतके सुंदर नसायचे . इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मोडीत अनेक इंग्रजी शब्द येऊ लागले त्यामुळे वाचन दुर्बोध होत गेले. राजकारभारात मोडी चा वापर कमी होऊ लागला . उचभ्रु , सुशिक्षित लोकं आपले लिखाण मोडी ऐवजी इंग्रजीत करणे प्रतिष्ठेचे मानू लागले. व हळूहळू मोडी लिपी अस्त होऊ लागली .मोडी व्यवहारात ठेवावी अथवा न ठेवावी यावर बरीच चर्चा १९१८ ( श. १८४० ) च्या सुमारास महाराष्ट्रात चालू होती ४-५ वेळा रद्दही करण्यात आली पण बरीच रदबदली करून कायदे कौन्सिलात तसा ठराव पास होऊनही मोडी लिपीला पुन्हा राजमान्यता प्राप्त झाली .
सन १९५२ नंतर शालेय पाठ्यक्रमातून मोडी लिपी वगळण्यात आली . काही काळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोडी अभ्यासक्रमात होती . मात्र हळूहळू मोडी हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला . ट्रेनिंग , कॉलेज मधील विध्यर्थ्यांना मोडीत निबंध लिहावा लागत असे .
पुढे इ. १९५९(श . १८८१ ) रोजी मंत्री मंडळाने मोडी लिपीला अनावश्यक ठरवून ती पूर्णपणे शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली व त्यामुळेच आजच्या पिढीला मोडी लिपी संदर्भात कोणतीही जाणीव नसणे हे स्वाभाविक आहे .